Sunday, July 23, 2017

हिंदी ही राष्ट्रभाषा का नाही ?


मी मराठीतच विचार करतो, खातो, झोपतो, स्वप्न पाहतो. भाषा हा भावनिक, बौद्धिक, आत्मिक, बंध आहे, मराठीत माझ्या असण्याची मूळं रुजलेली आहेत, इतर भाषांशी माझं नातं असं नाही. 
 महेश एलकुंचवार, प्रसिद्ध मराठी लेखक-  

आपल्या भारतात राष्ट्रभाषा, राज्यभाषा, राजभाषा ह्या नावाने मराठी मोठी की देशाच्या दृष्टीने दुसरी कोणती भाषा मोठी असे प्रश्न नेहमीच विचारले जातात, पाडले जातात, तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, संपर्क भाषा आणि राष्ट्रभाषा एकच नाहीत! 
पर्यटकांना बाहेरच्या राज्यात गेल्यावर लागते ती संपर्कभाषा, ती इंग्रजी, हिंदी, कोंकणी -तुम्हाला येणारी कोणतीही असू शकते, तुमच्या सोयीनुसार. ती तुम्ही निवडायची असते, अमुक एक भाषाच संपर्कभाषा म्हणून वापरा असं स्वतंत्र देशात सांगायचं नसतं. मी स्वतः गोव्यात गेल्यावर मराठी किंवा कोंकणी वापरतो, आंध्र-तेलंगण राज्यांत तेलुगु भाषा वापरतो, गुजरातेत गेल्यावर मला येत असलेली थोडंफार गुजराती वापरेन.
आपल्या देशात फक्त ५ टक्के लोक एक राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात,पर्यटन तसेच कामानिमित्त, त्यातही महाराष्ट्रासारख्या अहिंदी राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांची संख्या अगदीच कमी, ह्या पाच टक्क्यांतले बहुतांश लोक उत्तरेतून दक्षिणेतील महाराष्ट्रासारख्या राज्यात येत असतात. परराज्यात कामानिमित्त स्थायिक झालेल्या लोकांनी तिथली भाषा शिकून तिथल्या लोकांशी एकरूप होणं अपेक्षित असतं. राज्येही भाषावार स्थापन झालेली असल्यानं त्या त्या राज्याला तिथली अशी स्वतःची भाषा आहे.

राष्ट्रभाषा म्हणजे ती की जिच्यामुळे आपलं राष्ट्रीयत्व सिद्ध होतं, जी भाषा येत नसल्यास तुमचं राष्ट्रीयत्व सिद्ध होत नाही अशी भाषा,अशी कोणतीही राष्ट्रभाषा भारतात नाही, अशी भाषा असणं हे घटनेच्या पूर्ण विरोधात आहे.
आपण एक बहुभाषिक देश आहोत त्यामुळं आपलं राष्ट्रीयत्व एक भाषा व्यक्त करू शकत नाही, भारतीय असण्यासाठी एखादी भाषा वापरलीच पाहिजे असं अजिबात आवश्यक नाही, असा प्रकार घटनेच्या समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य ह्या तीन मुलभूत तत्वांच्याच विरुध्द जाणारा आहे. 

कोणत्याही एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देणं हे ती भाषा बोलणाऱ्या नागरिकांना विशेष दर्जा देण्यासारखं आहे. भारतातले सगळे नागरिक हे घटनेनुसार समान असल्याने एका भाषेला विशेष दर्जा देऊन ही समानता काढून घेता येणार नाही. एकवेळ हिंदीला राष्ट्रभाषा असा दर्जा दिला तर हिंदी भाषा बोलणारे जास्त भारतीय आणि  इतर भाषा बोलणारे कमी भारतीय असा अर्थ त्यातून निघतो. त्यामुळे राष्ट्रभाषा ही संकल्पना घटनाविरोधी आणि परिणामी देशविरोधी ठरते.

ह्या एका राष्ट्रभाषेचा हट्टापायीच आपल्या शेजारील पाकिस्तानचे तुकडे पडून बांग्लादेश वेगळा झाला, श्रीलंकेत भाषिक संघर्ष भडकला. 
नुकतंच ह्याबाबतीत ज्येष्ठ उर्दू कवी गुलझार ह्याचं वक्तव्य आलं होतं ज्या ते म्हणतात कि मराठीसुद्धा राष्ट्रभाषाच आहे (इथं वाचा) 

हिंदीव्यतिरिक्त असलेल्या भाषांचा उल्लेख सर्रास प्रादेशिक भाषा असा केला जातो, परंतु मला तो चुकीचा वाटतो. तामिळ अभिजात आणि अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. मराठी, गुजराती, बंगालीदेखील अभिजात दर्जाच्या आहेत. त्यांना प्रादेशिक म्हटले जाऊ शकत नाही.

भारताला राजकीय स्वातंत्र्य तर मिळाले, मात्र सांस्कृतिक स्वातंत्र्य अद्याप मिळाले नाही. अद्यापही आपण वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाहीत असे वाटते.
गुलझार-

भारतातल्या न्यायालयाने हिंदी राष्ट्रभाषा नाही हे सांगितलेलं तर आहेच पण त्याहीपुढे जाऊन अहिंदी भाषिकांसाठी हिंदी ही परभाषा (इथं वाचा) हेही सांगितलेलं आहे, हिंदी ही कधीही राज्यभाषेला पर्याय म्हणून वापरली जाऊ शकत नाही तसेच कोणालाही ती वापरण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही.

शेतकऱ्यांना हिंदीतून नोटीस देण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हिंदी गुजरातींसाठी परदेशी भाषा असल्याचे म्हटले आहे.न्यायाधीश व्ही. एम. सहाई यांनी हा निर्णय देत शेतकऱ्यांना नोटीस गुजरातीमधून न देण्यात आल्याने या रस्त्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयाकडून हा प्रकल्प रद्दही केला जाऊ शकतो.

त्यामुळं संपर्कभाषा किंवा राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदीसक्ती ही मराठीच्या मुळावर येणारी आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात मराठीच हे सूत्र वापरावं, हिंदीचा पर्याय देणं म्हणजे सरळसरळ मराठी शिकायची गरज संपवणं. जेव्हा एखाद्या प्रगतीशील असलेल्या प्रदेशात पूर्णच समजाला एखादी परभाषा येते तेव्हा तो प्रदेश दुभाषिक होत जातो, आपसूकच व्यवहारातून तिथली देशी भाषा हद्दपार होते, देशी भाषा शिकायची गरज संपून जाते. बाहेरून आलेल्या लोकांना सोडा, पण देशी भाषा मातृभाषा असणाऱ्यापुढच्या पिढीलाही आपली भाषा शिकायची गरज वाटत नाही, ती भाषा एकतर घरापुरती (इंग्रजीत ज्याला किचन् लँग्वेज् म्हणतात) तशी बनून राहते किंवा त्या प्रदेशाच्या वापरातून नष्ट होते. 
हा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून भाषिक वसाहतवादच आहे, ह्या भाषिक वसाहतवादाच्या पहिल्या पायरीवर दुभाषिक झालेल्या आपल्या दृष्टीकोनात बदल झालेला असतो, ह्याची पुढची पायरी म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या नव्याने आलेल्या भाषेलाच आत्मसात करतात, गरज नसलेली आपली देशी भाषा शिकत नाही, टाकून देतात. काही जणांना तर आपल्या मायबोलीचीच लाज वाटायला लागते. आज आपण जर मुंबईतल्या काही लोकांची स्थिती पाहिल्यास हीच गत झालेली दिसून येईल.

ह्याबाबतीत आयरिश् भाषेचं उदाहरण बघता येईल (इथं वाचा)एकेकाळी वापरातून जवळपास निघून गेलेली आयर्लंडची आयरिश् भाषा आज तिच्या बोलणाऱ्यांच्या आग्रह आणि प्रयत्नामुळे परत एकदा मोठ्या श्रमाने वर येत आहे.

राष्ट्रभाषा आणि संपर्कभाषा ह्याशिवाय भारतात राजभाषा हाही एक प्रकार आहे, त्याविषयी पुढच्या लेखात लिहायचा प्रयत्न करीन.


संदर्भ 
१. 'गुजरातींसाठी हिंदी ही परदेशी भाषा' - गुजरात उच्च न्यायालय http://72.78.249.126/esakal/20120101/5485309142970143565.htm

२. मराठी, बंगाली, गुजरातीही हिंदीप्रमाणे राष्ट्रभाषा; प्रसिद्ध गीतकार गुलजार http://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MODI-marathi-bengali-gujarati-are-national-language-like-the-hindi-5664181-NOR.html

३.The Decline of the Irish Language in the Nineteenth Century. http://www.yeatssociety.com/news/2015/03/09/the-decline-of-the-irish-language-in-the-nineteenth-century/

5 comments:

suyog parab said...

अभ्यासू लेख. दाखले फार छान दिलेत. देशप्रेम हिंदीतच व्यक्त होते, मराठी त्यासाठी अपात्र आहे हा ही एक गैरसमज आपल्या समाजात पसरला आहे. तो लवकरच दूर होईल, अशी अपेक्षा. मराठी रयतेने राष्ट्रभाषाचे ओझे भिरकावून देणे.

Mahadev Deshmukh said...

खूपच छान माहिती मिळाली आता इतरत्र लोकांना राष्ट्रभाषेविषयीची असलेली अंधश्रद्धा पुराव्यानिशी पटवून देता येईल. असेच लेख लिहत जा.

Unknown said...

छान आहे लेख. आपलं राष्ट्रीयत्व एक भाषा व्यक्त करू शकत नाही.

Unknown said...

आवश्यक असा माहितीपूर्ण लेख.

संतोष म्हसकर (Santosh Mhaskar) said...

खुप छान माहिती आहे.